पोलीस उपमुख्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती परिसरातील विकासकामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

बारामती, दि. २ : पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील टप्पा क्रमांक दोनच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील बांधकामाची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केली. त्यावेळी ते बोलत होती. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

वन्यजीव सप्ताहचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील परिसरात तसेच कन्हेरी वन उद्यान येथे वृक्षारोपणही करण्यात आले.

उपमुख्यमंत्री यांनी केली बारामती परिसरातील विकास कामांची पाहणी
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज बारामती परिसरातील कन्हेरी वन उद्यानातील मुलांचा मनोरंजन पार्क, झुलता पूल, बोटिंग घाट, ॲम्पी थिएटर, तलाव, गोजुबावी येथील नियोजित श्वान पथक कार्यालयाची जागा, पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील बांधकाम, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा, कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, परकाळे बंगला येथील कालव्यावरील पूल आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन बहुउद्देशीय हॉलचे काम आदी ठिकाणी सुरू असलेली विविध विकास कामांची पाहणी केली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ असावीत. साहित्य उत्तम प्रतीचे असावे. इमारतीच्या भोवती वृक्षांची निवड करूनच लागवड करावी. संरक्षक भिंतीचे बांधकाम योग्य असावे. नवीन इमारतींचे रंग उठून दिसणारे असावेत. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या कामासाठी शेजारील शेतकऱ्यांनी जागांसंदर्भात शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पुणे मंडळाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, मुख्याधिकारी महेश रोकडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे संचालक सचिन सातव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *