टीसी महाविद्यालयात स्वररंग -2023 जल्लोषात संपन्न.

बारामती :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे विद्यार्थी विकास मंडळ व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वररंग’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव 2023 चा पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात संपन्न झाला. विद्या प्रतिष्ठानचे कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा संघ ‘स्वररंग’ 2023 बारामती विभागाचा विजेता संघ ठरला. तर उपविजेतेपद विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज, बारामतीला मिळाले. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी होते. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी या समारंभाचे अध्यक्षपद भूषविले. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य श्री. विकास शाह (लेंगरेकर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

    प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य व समन्वयक प्राध्यापक व सर्वच आयोजकांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मनभरून कौतुक व अभिनंदन केले. युवक महोत्सवातील सहभागी विद्यार्थी स्पर्धकांचा उत्साह व जल्लोष पाहून  कार्यक्रमाचे अध्यक्ष व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. मिलिंद शहा (वाघोलीकर) यांनी आनंद व्यक्त करत  यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले.तसेच भविष्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम आयोजित करण्याची संधी मिळाल्यास आम्ही ती निश्चितच स्वीकारू आणि यशस्वी करू." असे आश्वासन दिले. या महोत्सवांमध्ये नृत्य, नाट्य, संगीत व वाद्य, वाङ्मय , ललित कला याअंतर्गत एकूण २९ कला प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. यात बारामती,इंदापूर, दौंड, कर्जत, जामखेड,  अशा पाच तालुक्यांमधून २२ महाविद्यालयातील ७०० विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी चैतन्य देशपांडे, हर्ष राऊत, हर्षद गोळेसर ,कृष्णा वाळके, नीरज सबनीस, प्रवीण शिंदे, राणू चंद्रन, शंतनू गंगाखेडकर, सिद्धेश उंडाळकर, सुनील देशपांडे, सुश्मिता पोवार, योगेश बोराटे हे विविध कलाप्रकारांमध्ये पारंगत असलेले राष्ट्रीय दर्जाची ख्याती प्राप्त परीक्षक लाभले होते. या स्पर्धेमधून प्रत्येक कला प्रकारात विजेते झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ पातळीवर सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. असे विद्यार्थी विकास सांस्कृतिक समन्वयक श्री. स्वामीराज भिसे यांनी पारितोषिक वाचन प्रसंगी सांगितले. विद्यापीठाचे वित्त विभाग कर्मचारी ऋषिकेश चव्हाण यांनीही विशेष सहकार्य केले.
 स्पर्धेच्या संयोजनामध्ये महाविद्यालयाची विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भगवान माळी, सांस्कृतिक अधिकारी प्रा. भीमराव तोरणे, प्रा. राजेंद्र कंडरे, प्रा. विशाल मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक प्रा. विजय काकडे तसेच महाविद्यालयांचे सर्व शाखांचे अधिष्ठाता, उपप्राचार्य रजिस्ट्रार, सहभागी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी युवा महोत्सवाला सहकार्य केले . कार्यक्रमाची सुरुवात पुणे विद्यापीठ गीताने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुशील देशमुख व डॉ. विवेक बळे यांनी केले. तर सांस्कृतिक अधिकारी प्राध्यापक भीमराव तोरणे यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जवाहर शाह वाघोलीकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *