प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय कॉर्फबॉल असोसिएशन व कॉर्फबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉर्फबॉल या खेळाचा लेव्हल ३ हा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक होण्यासाठीचा कोर्स नुकताच भारतीय कॉर्फबॉल महासंघाने लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फगवारा पंजाब या ठिकाणी दि. १९ ते २२ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजित केला होता. या कोर्ससाठी महाराष्ट्र कॉर्फबॉल संघटनेकडून डॉ.गौतम जाधव यांची निवड झालेली होती. या कोर्ससाठी आशिया खंडातून १२ कोच सहभागी झाले होते. आय.के.एफ. इन्स्ट्रक्टर जॉर्ज एल्विस व यान यॉर्क या नेदरलँडच्या कोर्स डायरेक्टरच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्स संपन्न झाला. या चार दिवसात सकाळ व सायंकाळ सत्रात प्रात्यक्षिक व दुपार सत्रात लेखी कार्य पूर्ण करून घेण्यात आले. कॉर्फबॉल या खेळाचा लेवल ३ हा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक कोर्स पूर्ण करणारे डॉ.गौतम जाधव हे महाराष्ट्रातून पहिलेच कोच ठरलेले आहेत. यापूर्वी त्यांनी व्हॉलीबॉल व कॉर्फबॉल खेळातील लेवल १ व लेवल २ आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक कोर्स पूर्ण केलेले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी डॉ. गौतम जाधव यांचे अभिनंदन केले आहे.