प्रतिनिधी – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळांतर्गत ‘स्वररंग २०२३ युवा महोत्सवा’चे आयोजन शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी केले आहे. या महोत्सवामध्ये वैयक्तिक सुगम गीत, भारतीय समूह गायन, शास्त्रीय गायन, लोक नृत्य, शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रयोग, एकांकिका, नाटक रांगोळी, व्यंगचित्र, मेहंदी, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा इ. एकूण २९ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांसाठी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार दि. २२ सप्टेंबर पर्यंत स्पर्धेसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार २१ महाविद्यालये यामध्ये सहभागी होणार असून ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांमार्फत नावनोंदणी केली आहे. या स्पर्धांकरिता इंदापूर, बारामती, कर्जत, जामखेड व दौंड या तालुका परिसरातील सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमधून विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाकरिता विद्यार्थी निवडले जाणार आहेत. या स्पर्धांचे को-ओर्डीनेटर म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.भगवान माळी व सांस्कृतिक अधिकारी म्हणून प्रा.भिमराव तोरणे काम पहाणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी दिली. या स्पर्धा नियोजनामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री.जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.