प्रतिनिधी – बारामती व पणदरे एमआयडीसीतील उद्योजकांना लहानमोठ्या कामांसाठी एमआयडीसीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी महिन्यातून दोनदा बारामतीला येऊन उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात ही बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनने केलेली मागणी रास्त असून यापुढे प्रत्येक पंधरवड्यात एमआयडीसीचे क्षेत्रिय अधिकारी नियमितपणे बारामती एमआयडीसी कार्यालयात येऊन उद्योजकांच्या समस्या सोडवतील अशी ग्वाही एमआयडीसीचे पुणे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली. बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनने एमआयडीसी विश्रामग्रहात आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करुन आणलेल्या नियोजित ईएसआयसी हॉस्पिटलसाठी लवकरच पाच एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असलेची माहिती बारवकर यांनी यावेळी दिली.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, मनोहर गावडे, संभाजी माने, हरीश कुंभारकर, एमआयडीसीचे उपाभियंता विजय पेटकर, भारत फोर्जचे सदाशिव पाटील, पियाजिओचे किरण चौधरी, चंद्रकांत काळे, डायनॅमिक्सचे मुकेश चव्हाण, जीटीएनचे संतोष कणसे, उद्योजक चंद्रकांत नलवडे, कृष्णा ताटे, संदीप जगताप, शिवाजी साळुंखे, अभिजित शिंदे, भारत मोकाशी, शिवराज जामदार, लक्ष्मण वीर, उदय रसाळ, सुधीर सूर्यवंशी, सर्जेराव दळवी, मारुती आव्हाड, अनिल कायगुडे, विनोद चौधर, अजय भोसले आदि उद्योजक या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनंजय जामदार म्हणाले एमआयडीसी पुणे प्रादेशिक कार्यालयातील क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी महिन्यातून दोनदा समक्ष येऊन उद्योजकांच्या समस्या सोडवणे, केंद्र शासनाकडून आम्ही पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेल्या ईएसआयसी हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा त्वरित उपलब्ध करून देणे तसेच अनेक वर्षांपासून भाडेतत्वावरील जागेत उद्योगव्यवसाय करणाऱ्या प्रामाणिक उद्योजकांना विस्तारित एमआयडीसी क्षेत्रात प्राधान्याने भूखंड उपलब्ध करून देणे आदी प्रमुख मागण्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे केल्या असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर बैठकीमध्ये डॉ गौतमी दिघे यांनी सर्वरोग निदानासाठी रक्त तपासणीच्या अत्याधुनिक यंत्रावर प्रात्यक्षिक सादर करून सविस्तर माहिती दिली व कामगारांची आरोग्य तपासणी करुन घेणेबाबत उद्योग प्रतिनिधींना आवाहन केले.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे सदस्य संभाजी माने यांनी आभार मानले.