शासकीय संगणक टायपिंग परीक्षा उत्तरपत्रिकेच्या पुर्नमुल्यांकनासाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद विभागाच्यावतीने जुलै २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग मराठी, हिंदी व इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि. विषयाच्या परीक्षेचा निकाल २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून १० दिवसात परीक्षार्थीने गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी तसेच पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची ऑनलाईन प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्याची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधीत संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे १०० जीएसएम कागदावर करून विद्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच संबंधीत विद्यार्थ्यांस सॉफ्टकॉपी पीडीएफ स्वरुपात देण्यात यावी, जेणे करून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार छपाई करुन घेता येईल. संस्थांनी संबंधीत विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र, गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी.

गुणपडताळणीसाठी प्रति विषय रुपये १०० प्रमाणे व छायाप्रत मिळण्यासाठी प्रति विषय रूपये ४०० प्रमाणे रक्कम ऑनलाईन पद्धतीने ३० सप्टेंबरपर्यंत भरावेत. गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयात पाच दिवसात पुर्नमुल्यांकनासाठी प्रती विषय रुपये ६०० प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरुन अर्ज करावेत, यानंतर आलेल्या अजांचा विचार केला जाणार नसून याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, असेही कळविण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *