कोतवाल पद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न

बारामती, दि.२१ : कोतवाल भरती निवड समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे असलेल्या सजांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे संपन्न झाला.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्याचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. त्यानुसार तालुक्यात एकूण १८ गावातील रिक्त असलेल्या कोतवाल संवर्गापैकी १४ गावातील आरक्षण बारामती येथील कु जिया अतुल साबळे वय ७ वर्ष यांच्या हस्ते ईश्वरी चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आले. उर्वरीत कोऱ्हाळे खु, ढाकाळे, सांगवी व उंडवडी क.प. या ४ सजांची ईश्वरी चिठ्ठी न निघाल्याने सदरची गावे कोतवाल भरती प्रक्रियेमधून वगळण्यात आली आहेत.

गावांचे नाव व आरक्षण प्रवर्ग पुढीलप्रमाणे
मळद (अनुसूचित जाती महिला), निबुंत-(अनुसूचित जमाती महिला), सिरष्णे व जळगाव सुपे (अनुसूचित जमाती), सुपे (भटक्या जमाती-ब), तरडोली (भटक्या जमाती-ड), शिरवली (विशेष मागास प्रवर्ग), जळोची, नारोळी, मोढवे (इतर मागास प्रवर्ग), लोणी भापकर (आर्थिक दुर्बल घटक महिला) कन्हेरी (आर्थिक दुर्बल घटक), माळेगाव बु. व शिर्सूफळ- (सर्वसाधारण महिला) असे एकूण १४ गावातील आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

यावेळी शासकीय मुलींचे वस्तीगृहाच्या गृहपाल सविता खारतोडे, संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *