प्रतिनिधी – नजीकच्या काळात आपला भारत देश जागतिक क्रमवारीत महासत्ता म्हणून तिसऱ्या क्रमांकावर येण्याचे स्वप्न नक्कीच साकारेल. भारतीय संस्कृती किती मौल्यवान आहे व तिचे संवर्धन जरुरी आहे. आपली संस्कृती व मूल्य या आधारे आपण कौशल्य विकास आणि मानव्य विकास साधू असे मौलिक विचार मा. श्रीमान गोरांग दास (B.Tech. आय.आय.टी.) यांनी आपल्या मधुर वाणीतून उदृत केले. आपला उत्साह, निश्चय, धैर्य आणि आपले प्रयत्न टिकवून ठेवणे गरजेचे आहे हे श्रीमद्भगवद्गीता आणि भागवताच्या आधारे त्यांनी स्पष्ट केले. कृष्ण भावना म्हणजे काही सोडणे नसून आपली चेतना शुद्ध ठेवून भगवंतांशी जोडले जाणे होय. चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी त्यांनी यावेळी युवकांना आवाहन देखील केले. गीता व भागवत अशा पवित्र ग्रंथातील शिकवणी आपल्या जीवनात उतरवून आपल्या घराला मंदिर बनवूया व कुठल्याही वर्तमान नकारात्मक परिस्थितीतही आपली चेतना दिव्य व उज्वल ठेऊ या असे आवाहन त्यांनी केले. आपल्या अध्यात्मिक इच्छांची पूर्ती होवो आणि येथे श्रीकृष्णांचे मोठे मंदिर बनो ही प्रार्थना आणि अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्या ज्या वेळी असुरांचा अत्याचार बळावला आणि धर्माचे पतन झाले त्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा ५२०० वर्षांपूर्वी देवकीचे आठवे पुत्र असा कंसाच्या बंदी शाळेत जन्म झाला. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ बारामती यांचेतर्फे २००३ सालापासून “श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे” आयोजन केले जाते. याही वर्षी बारामती येथील मुक्ताई लॉन्स येथे ५००० जनसमुदायासाठी उत्साहाने या महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी कीर्तन,अभिषेक, बालनृत्य, नाटिका व श्रीश्री राधा गोपीनाथ मंदिर, मुंबई येथील आदरणीय गौरांग दास ( B.Tech., IIT) यांच्या मधुर वाणीतील प्रवचन, महाआरती, अभिषेक आणि प्रीती भोजन असा भरगच्च कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात कला संस्कृतीचा अविष्कार अर्थात “देवकीनंदन तुमसे वंदन” हे बाल नृत्य तसेच “गोपी गोपालम्” यावर कृष्णलीलांचे मनमोहक सादरीकरण नृत्यातून करण्यात आले. कला, अध्यात्म, मनोरंजन आणि जीवन शिक्षण या आधारे “सर्वोत्तम माता” या विषयाची ध्रुव महाराज यांबद्दल उत्कृष्ट अशी नाटिका सादर करण्यात आली. महाआरतीच्या वेळी श्रीश्री राधाकृष्ण यांच्या विग्रहांना १०८ पदार्थांचा भोग दाखविण्यात आला तर अभिषेक २०८ कुटुंबीयांतील सुमारे ५०० सदस्यांनी पुजारी भक्तांच्या मार्गदर्शनाने केला. अभिषेकासाठी देशी गाईचे शुद्ध दूध, दही, तूप, मध, फळांचा रस व इतर तब्बल ३० जिन्नस यांचा वापर केला गेला. आलेल्या सर्व जणांनी प्रीती भोजनाचा आस्वादही घेतला.
श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजे सकारात्मक ऊर्जा, उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे. भगवंतांचे जन्म आणि कर्म दोन्हीही दिव्यच, त्यांच्या शिकवणीतून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी श्रीमान नंददुलाल दास (B.Tech.) यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापन समिती, इस्कॉन बारामती नेहमीच प्रयत्नशील असते. येथे लहान मुले, महिलावर्ग आणि महाविद्यालयीन युवक यांच्यासाठी वेळोवेळी आध्यात्मिक व जीवन उपयोगी गोष्टींसाठी मूल्य आधारित मार्गदर्शनपर कार्यक्रम, तीर्थक्षेत्रांना यात्रा आणि विविध स्पर्धा यांचे आयोजन विविध समितींद्वारे केले जाते. समाजातील विविध घटकांसाठी जीवन नैतिक मूल्यांवर जगणं किती आवश्यक आहे आणि त्यासाठी श्रीकृष्णांचे मार्गदर्शन किती उपयुक्त आहे हे समाजमनावर उमटविण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून केले जातात. बाल संस्कार वर्ग, साप्ताहिक सत्संग, गीता वितरण व अभ्यास, गीता जीवनी, सांस्कृतिक कार्यक्रम, गौरनिताई शोभायात्रा, नगर संकीर्तन, दिंडी सोहळा हे उपक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत राबविले जातात व याबद्दलची माहिती श्रीमान नंदलाल प्रभुजींनी सुमारे ५००० उपस्थितांना त्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून आणि स्टॉलसच्या माध्यमातून दिली. “प्रवास आत्मशोधाचा” या भगवद्गीते वरील पवित्र ग्रंथातून उद्बोधन पर वर्गाचे आयोजन केले जाते, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमासाठीचे सूत्रसंचालन डॉ. नवनाथ जंजाळे व प्रा. नीलिमा पेंढारकर यांनी केले.