कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा सुवर्णमहोत्सवी वर्ष करणार साजरे

प्रतिनिधी – कविवर्य मोरोपंतांची बारामती म्हणून या नगरीचा नावलौकिक आहे. कविवर्य मोरोपंत हे अफाट बुद्धिमत्ता लाभलेले कवी होते. शब्दावर कमालीचे प्रभुत्व असलेले मोरोपंत हे मराठी साहित्याला लाभलेले लेणे होते. त्यांनी त्या काळात ७५ हजारवरून अधिक आर्यांची निर्मिती केली होती. बारामतीच्या नावलौकिकात भर घालणा-या या महान कवीचे स्मरण व्हावे म्हणून बारामती नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष कै.विनोद शेठ गुजर, कै.धोंडीबा आबाजी सातव, पद्माताई सिधये, कै.कमलाकांत ढवाण पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नगरपालिकेच्या वतीने चांदीच्या फिरत्या ढाली व रोख पारितोषिकासाठी रक्कम दिली. त्यानंतर शहरातील अनेक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती यांनी वेळोवेळी यथाशक्ती बक्षीसे दिली. विजेते स्पर्धक ५० हजारापेक्षा जास्त रकमेची बक्षिसे जिंकतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयीन स्तरावर मोरोपंत स्पर्धेचा नावलौकिक आहे. बारामती नगरपरिषद आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने कविवर्य मोरोपंत स्पर्धेचे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजन केले जाते. यावर्षी या स्पर्धा दि. ५ व दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केल्या आहेत. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा घेतल्या जातात. यात कनिष्ठ विभागासाठी फक्त वक्तृत्व व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, वादविवाद व उत्स्फूर्त स्पर्धा असतात. संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोप-यातून विद्यार्थी या स्पर्धेसाठी येतात. विद्यार्थ्यांचे समाजभान, त्यांचे भाषेवरील प्रभुत्व आणि तितक्याच ताकदीने व्यक्त होण्यासाठी आयोजिलेल्या या उपक्रमाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने सुरु केलेल्या या स्पर्धांसाठी राज्यातील अनेक महाविद्यालयातून मोरोपंत जिंकण्याचे स्वप्न घेऊन विद्यार्थी सहभागी होतात नि ख-या अर्थाने हे महाविद्यालय वक्तृत्व पंढरी होऊन जाते.
या स्पर्धेने अनेक चांगले वक्ते, समाजसेवक, राजकारण, चित्रपट, शिक्षण, नाट्य, वकिल, पत्रकार, विचारवंत दिले आहेत. त्यांच्या माध्यमातून समाजाची सर्व स्तरावर सामाजिक, सांस्कृतिक. शैक्षणिक प्रगती झाली आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये श्री.अविनाश धर्माधिकारी, डॉ.अरुणा ढेरे, समीरण वाळवेकर, अभिराम भडकमकर, परेश मोकाशी, माधुरी दीक्षित, भक्ती हुबळीकर, प्रदिप टिल्लू या मान्यवरांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांना या व्यासपीठाच्या आधारे अनेक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. राजकारण, समाजकारण ढवळून काढणा-या नवविचार रोपण करणा-या वक्त्यांची परंपरा या स्पर्धेला लाभली आहे. दर्जेदार अशा या स्पर्धेतून विद्यार्थ्याचे चिंतन, मनन, वाचन वाढते. या स्पर्धेसाठी विविध प्रकारचे विषय वक्तृत्वासाठी दिले जातात तर वाद स्पर्धेसाठीचा प्रस्ताव वस्तुस्थिती दर्शक असतो. तर ऐनवेळी विषय देऊन उत्स्फूर्त स्पर्धेचे विषय दिले जातात हे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य. या स्पर्धेसाठी या वर्षी कनिष्ठ आणि वरिष्ठ गटासाठी खालीलप्रमाणे विषय निश्चित केलेले आहेत.
वादविवाद स्पर्धा-प्रस्ताव- ” सद्यकालीन राजकीय परिस्थिती लोकशाहीस मारक आहे. वक्तृत्व स्पर्धा – कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ वक्तृत्व स्पर्धा – वरिष्ठ महाविद्यालय
१. डिजिटल युगातील हरवलेले बालपण १. रानकवी ना. धों . महानोर
२. प्रेम, नकार आणि हिंसा २. कृत्रिम बुद्धिमत्ता एक आव्हान
३. आर्या मयूरपंतांची ३. अस्वस्थ भारत: लोकशाही मूल्यांचा ऱ्हास
४. माझ्या कल्पनेतील समृद्ध महाराष्ट्र ४. मोरोपंतांच्या काव्यातील रचना सौन्दर्य
५. महाविद्यालय -संस्कार केंद्र की परिक्षा केंद्र? ५. भारत एक उदयोन्मुख महासत्ता
६. जैन आहार विहार आणि आजचे डाएट ६. समाज माध्यमे आणि विचार स्वातंत्र
७. अनेकान्तवाद सद्यकालीन उपयुक्तता …. गेल्या ५० वर्षांची उज्ज्वल परंपरा, दर्जेदार कवी परीक्षक, चोखंदळ श्रोते यांचा वारसा लाभलेल्या वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा तरुणाईला विचार व्यक्त करण्यासाठी साद घालत आहे. स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी www.tccollege.org/moropant या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन कार्याध्यक्ष प्रा.कृष्णा कुलकर्णी यांनी केले आहे. (प्रा.कृष्णा कुलकर्णी भ्रमणध्वनी व व्हाट्सअप – ८७८८९३३६३८) या क्रमांकावर किंवा महाविद्यालय दूरध्वनी क्रमांक ०२११२ २२२ ४०५ यावर संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *