डोर्लेवाडी (प्रतिनिधी, जावेद शेख ) मौजे डोर्लेवाडी येथील शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात सुमारे 45 लाख रुपयांची थकबाकी जमा केली होती. सद्यस्थितीत गावातील सर्वच डीपी महावितरणने बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खूप अडचण झाली आहे. दोन महिन्यांपासून नीरा डावा कालवा मधील पाणी न सुटल्यामुळे पिके जळायला लागली आहेत. गुरांचा चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाईट बिल भरूनही बाकीच्या शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे डीपी बंद ठेवले आहेत. त्यामुळे नियमित लाईट बिल भरणारे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कोरोना परिस्थितीत आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. डीपी च्या बंदमुळे त्यात अधिक भर पडली आहे. याबाबत डोर्लेवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांना पत्र दिले असता त्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम मार्गी लावले. अर्ज स्वीकारताच संभाजी नाना होळकरांनी आदेश देताच महावितरण ने तूर्तास कारवाई थांबविली आहे.