प्रतिनिधी – चायनीज तायपे येथे दि. १७ ते ३१ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होणा-या आय.के.एफ. जागतिक अजिंक्यपद कॉर्फबॉल स्पर्धेसाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रणव पोमणे एम.कॉम.भाग-१ याची भारतीय संघात निवड झाली आहे. निवड झालेल्या भारतीय संघाच्या स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फगवारा या ठिकाणी दिनांक १३ सप्टेंबर २०२३ ते २४ सप्टेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. प्रणव हा इयत्ता ११ वी पासून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेत असून सुरुवातीपासूनच जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर त्याने सलग दुस-यांदा भारतीय संघात आपले स्थान मिळविलेले आहे. प्रणव हा फलटण तालुक्यातील खटके वस्ती, गोखळी या ठिकाणचा मूळचा रहिवासी असून ग्रामीण भागातील एक खेळाडू आपल्या सामान्य परिस्थितीवर मात करीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुस-या वेळेस खेळत आहे ही महाविद्यालयासाठी गौरवाची बाब आहे.
प्रणव याला चायनीज तायपे येथील स्पर्धेकरिता संस्था व महाविद्यालयातर्फे रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य संस्थेचे सन्माननीय जेष्ठ सदस्य विकास शहा लेंगरेकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे. संस्था व महाविद्यालय अनेक हुशार व कष्टाळू विद्यार्थ्यांना नेहमीच आर्थिक सहाय्य करीत असते. प्रणव याची भारतीय संघात झालेल्या निवडीबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्रणव यास जिमखाना विभागाचे प्रमुख व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गौतम जाधव व प्रा.अशोक देवकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रणव याच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, जेष्ठ सदस्य विकास शहा लेंगरेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे व पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed