पुणे, दि. ४: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांनी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्याकरिता प्रवेश फेरीस ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आली आहे.

याअंतर्गत विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांस समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेतील उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश शुल्क भरुन प्रवेश निश्चित करण्यास ६ सप्टेंबर सायं. ५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

संस्थास्तरीय ३ऱ्या समुपदेशन फेरीअंतर्गत सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहतील. समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेश फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची व उमेदवारांना संदेश द्वारे कळविण्याची कार्यवाही ७ सप्टेंबर रोजी ५ वाजेपर्यंत करण्यात येईल.

नोंदणीकृत तथा अप्रवेशीत उमेदवारांनी औद्यागिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करुन संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी उमेदवारांनी व्यक्तिश: ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत सर्व मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed