पुणे, : . खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२३ असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
खरीप हंगाम सन २०२३ मध्ये आतापर्यंत २४ हजार ९२० खातेदारांनी २४ हजार ६२८ हेक्टर आर क्षेत्रावर मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीच्या नोंदी केल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असतांना नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळते. पीक पेरणी अहवालाचा रिअल टाईम क्रॉप डाटा संकलित होण्याच्यादृष्टीने ई-पीक पाहणी महत्वाची असून माहिती संकलित करताना पारदर्शकता येते.
पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभागामुळे कृषी पत पुरवठा सुलभ होतो. पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते. ॲपवर नोंद असल्यास शासनाच्या विविध योजनाच्या लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे उर्वरीत खातेदारांनी दिलेल्या मुदतीत मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीची उत्सुर्फतपणे नोंद करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कळविले आहे.