बारामती : ‘समाजातील संस्कारातून कलाकाराची जडणघडण होते. त्यामुळे कलाकाराने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. त्याचे वर्तन समाजासाठी पूरक असले पाहिजे.’ असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते मा. प्रदीप कोथमिरे यांनी काढले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळ व अस्मिता भित्तिपत्रकाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप हे होते. मा. प्रदीप कोथमिरे म्हणाले, ‘ नटाचा अभिनय वाचनाने समृद्ध होतो. त्यामुळे विद्यार्थी दशेतच वाचनाची सवय असणे गरजेचे आहे. अस्मिता भित्तिपत्रक हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. भित्तिपत्रकाच्या माध्यमातून अनेक कवी, लेखक व चित्रकार निर्माण झाले आहेत.’ असे सांगून त्यांचा भित्तिपत्रकापासून सुरु झालेला अभिनयाच्या क्षेत्रातील प्रवास उलगडला. तसेच अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी नटाला कोणकोणत्या गोष्टींचा व्यासंग करावा लागतो हे सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. तसेच त्यांच्या पहाडी आवाजातील संवाद कौशल्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. डॉ. अविनाश जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ‘बारामतीला कलेची परंपरा आहे. बारामतीमध्ये पूर्वी अनेक कलाकारांचा अगदी सहज वावर होता.’ असे सांगत बारामतीच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख करून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी आपली कलेची आवड जोपासावी, असे सांगून अस्मिता भित्तिपत्रकात लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.सीमा नाईक – गोसावी यांनी केले. अस्मिता भित्तिपत्रकाच्या प्रमुख डॉ.मुक्ता आंभेरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.सुनील खामगळ यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. प्रतिभा जावळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed