बारामती ( प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) राज्यात अथवा देशात कोणतेही संकट आले की बारामतीकर मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतात. नुकत्याच झालेल्या जलप्रलयानंतर सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही बाब लक्षात घेत बारामतीच्या दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनने पुढाकार घेत ‘एक हात सामाजिक जबाबदारीचा’ या उपक्रमांतर्गत वाई तालुक्यातील जोर या गावातील ग्रामस्थांना मदत पोहोच केली.
मागील काही दिवसांपूर्वी सातारा, कोल्हापूर, सांगलीसह कोकणात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागांमध्ये शासकीय मदतीबरोबरच विविध सामाजिक संस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. बारामतीतील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जोर गावातील ७५ कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे किट देण्यात आले.
यावेळी अभिजीत घाडगे, अविनाश बांदल, अनिकेत पवार, तुषार लोखंडे, चंदू लोंढे, सतीश झारगड, राकेश दुर्गाडे, अक्षय परकाळे आदीनी प्रत्यक्ष जोर गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना गृहपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. संकट काळात दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनने दिलेल्या मदतीबद्दल जोर गावातील ग्रामस्थांनी आभार मानले. या उपक्रमासाठी बारामतीतील विविध दानशूर व्यक्तींसह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हातभार लावला.