पुणे, दि. 22: ‘पर्यावरणाप्रती कृतज्ञता-वृक्षारोपण व संवर्धन’ या अभियानाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्यावतीने २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मोरगाव येथे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते २० हजाराहून अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन सा. बां. (वैद्यकीय) उपविभाग बारामतीच्यावतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्री. चव्हाण यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचारी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि शासकीय इमारत परिसरात किमान १० फूट उंचीचे २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करणे या वृक्षारोपणाचा मुख्य हेतू आहे.

वृक्षारोपणासाठी १० ते १२ फूट उंचीच्या वैशिष्टपूर्ण झाडांची निवड आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील नर्सरीमधून करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, सोनचाफा, कदंब, बहावा, आंबा, मोहोगणी, कैलासपती आदी वृक्षांची लागवड करुन शाश्वत आणि हरित पर्यावरण करण्याचा संकल्प केला आहे. यामुळे परिसर सुशोभीकरण, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदलाचे परिणामावर उपाययोजना यासारखे पर्यावरणीय फायदे होण्यास मदत होणार आहे.

प्रादेशिक विभागातील ५ जिल्ह्याअंतर्गत असलेल्या १७ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त असलेली पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे तसेच नागरिकांच्यी गर्दी असलेल्या ठिकाणी किमान ५ कि.मी. लांबीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता श्री. चव्हाण यांनी दिली.

श्री. चव्हाण यांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवत स्वतः १ हजार झाडे देण्याचा व त्यांचे वृक्षारोपण करुन १३ वर्ष जगविण्याचा संकल्प केला आहे. सर्व अभियंत्यांनी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त करुन पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण केली आहे.

मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन: निसर्गाचे आपण देणे लागतो आणि आपण निसर्गास काही तरी दिले पाहिजे या उदात्त हेतूने रस्त्याच्या कडेला आणि शासकीय इमारती परिसरात झाडे लावून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *