बारामती (प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) आपलं घर संसार सांभाळणारी महिला जेव्हा इतर महिला भगिनींच्या मदतीला सरसावते तेव्हा मोडून पडलेला संसार देखील पुन्हा उभा राहू शकतो याचाच प्रत्यय खिद्रापूर येथील महिला भगिनींना आला. बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला थेट कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या. आपण बरेच वेळा पाहत असतो, ऐकत असतो, पुरुषांनी किंवा तरुणांनी मदतीमध्ये पुढाकार घेऊन एखादं कार्य पार पाडलं. परंतु कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची आमचीही तयारी आहे. तुम्ही फक्त धीर द्या, पाठीशी हात ठेवा, असा संदेश या महिलांनी अप्रत्यक्षरीत्या दिला आहे.
कोल्हापूर- सांगली पुन्हा एकदा पाण्याच्या वेढ्यात अडकले. त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रासह अख्खा महाराष्ट्र या सर्व गावांच्या मदतीला धावून गेला. मात्र यामध्ये यावेळी महिला देखील हिरीरीने तेवढ्याच क्षमतेने पुढे आल्याने ग्रामस्थांना देखील मोठे कौतुक वाटले. याचेच कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील वाटले. शनिवारी बारामतीत आल्यानंतर त्यांनी या महिलांचे मनापासून कौतुक केले आणि कोणत्याही संकटात अशाच प्रकारे संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या बारामतीचा अभिमान वाटतो अशा शब्दांत अजित पवार यांनी या महिला कार्यकर्त्यांचे कौतुक केले. बारामतीतील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अनिता गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकारी शोभा मानके, रेहाना शेख, स्वाती बाबर, आदिती घाडगे, रेश्मा ढोबळे, सचिन बाबर, मोहन भाटीयानी, श्रीकांत जाधव, चेतन जाधव, निलेश गायकवाड, राजू मोरे आदींनी थेट खिद्रापुर गावात जाऊन तेथील कुटुंबियांना तातडीची मदत केली आहे .