पुणे, दि.१४ : कृषि विभागाच्या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्यामार्फत नोंदणी प्रक्रिया सुरु असून उत्पादक कंपन्यांनी १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत नोंदणीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक यांनी केले आहे.
राज्य शासनामार्फत संरक्षित शेती तंत्रज्ञानास कृषि विभागाच्या विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहन देण्यात येते. संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर, डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेल नेट या घटकाचा समावेश आहे. साहित्याची गॅरंटी, वॉरंटी व दुरुस्ती याबाबत हमी मिळणे, याअनुषंगाने पॉलीफिल्म, टेपनेट, मोनोनेट, इन्सेक्ट नेट, ॲप्रॉन पेपर, प्लास्टिक आच्छादन, जीआय पाईप, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेलनेट कव्हर या साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उत्पादक कंपन्यांच्या नोंदणी प्रक्रियेबाबत अटी, शर्ती व इतर तपशील कृषि विभागाच्या www.mahanhm.in या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे फलोत्पादन विभागाने कळविले आहे.