बारामती, दि. १०: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सूविधा, आस्थापनाविषयक बाबी तसेच औषधे व साहित्य खरेदी आदींचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तहसिलदार गणेश शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, रुग्णालयातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा अनुषंगाने कार्यवाही करावी. रुग्णालय आवारात १२ लाख लिटर इतक्या क्षमतेची टाकी बांधण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. पाण्याच्या टाकीबाबत प्रस्ताव तयार करताना पुढील तीस वर्षातील वाढीव लोकसंख्या विचारात घ्यावी. रिक्त पदांची आवश्यकता लक्षात घेता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या सुरक्षितेतच्यादृष्टीकोनातून सुरक्षा रक्षकांची भरती करणे, रुग्णालयातील साहित्य व औषधे खरेदी प्रकियेबाबत आढावाही डॉ. देशमुख यांनी घेतला.

शासनस्तरावर प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याबाबत संबंधित विभागाने पाठपुरावा करावा. या रुग्णालयातून नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी प्रयत्न करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, बारामती सर्वोपचार रुग्णालयाला अनुज्ञाप्ती (लायसन्स) मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांनी रुग्णालयातील कामकाजाची माहिती दिली.
बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी रुग्णालयातील सिटी स्कॅन व एक्स रे कक्षाची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed