बारामती- बारामतीचा सुपुत्र अमोल चिमाजी गोंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केल्याने त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल बारामती शहर होलार समाजाच्या वतीने अमोल गोंडे यांना भारताचे संविधान (The Constitution of India) हे पुस्तक भेट देत होलार समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी गोरख पारसे, बाळासाहेब देवकाते, रोहित बनकर, संतोष जाधव, भारत पारसे, नारायण ढोबळे, हनुमंत खांडेकर, रवींद्र जाधव, राजकुमार कुलकर्णी, ताराचंद गोंडे, विजय अहिवळे, मनोज केंगार, उमेश कांबळे, शेखर अहिवळे, पत्रकार सुरज देवकाते या सह होलार समाजातील अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
भिक्षा मागून शिक्षण घेतलेल्या भटक्या विमुक्त म्हणून समाजात ओळख असलेल्या जोशी समाजातील अमोल चिमाजी गोंडे या युवकाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालुन इतिहास घडविला असुन बारामती तालुक्यातील जोशी समाजाचा पहिलाच व्यक्ती पोलिस दलात सामील झाल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.यामुळे शिक्षणाने कसे परिवर्तन होऊ शकते याची प्रचिती आली आहे.
बारामती तालुक्यातील मेडद येथे भटक्या विमुक्त समाजातील जोशी समाजाची लोकवस्ती मोठी आहे.दारोदारी भिक्षा मागून प्रपंच करणे ही परंपरा असलेल्या जोशी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.अशातच अमोल चिमाजी गोंडे याने स्वअध्ययन करुन शिक्षणाच्या जोरावर मोठी मजल मारली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत नंदीबैल घेऊन वडील चिमाजी बाबा गोंडे ,आई मालन चिमाजी गोंडे यांच्या समवेत अमोल व इतर भावंडांनी याने दारोदारी भिक्षा मागून घरगाडा चालविला. अमोल हा उपजतच हुशार होता.त्याची हुशारी पाहून आई- वडील व इतर भावंडांनी अमोलला शिक्षणासाठी मदत केली. पाचवी पर्यंत भटकंती करुन अमोलने शिक्षण घेतले. मेडद गावात सातवी नंतर शाहु हायस्कूल बारामती येथे माध्यमिक तर टी.सी.कॉलेजमधे वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले.शिक्षण झाल्यावर समाजात वेगळे काही तरी करून दाखवावे यासाठी पोलिस दलात कठोर मेहनत व जिद्द, चिकाटीच्या जोरावर अनेकदा अपयश आले तरी खचुन न जाता पोलिस उपनिरीक्षक म्हणून अशक्यप्राय असलेले यश खेचून आणले.