बारामती :- अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती आणि राष्ट्रीय बागवानी बोर्ड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त राष्ट्रीय बागवानी बोर्डच्या विविध योजनांविषयी दि. १७/०६/२०२३ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
केंद्रसरकार विविध फळबाग लागवड योजना व शेतीसाठी उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञान राबविण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य करण्यासाठी सहमत आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय बागवानी बोर्डाचे पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. ए. के. सिंग यांनी सांगितले व प्रकल्पानुसार आणि राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या मापदंडानुसार ३५ % ते ५० % अनुदान लाभधारकास देता येते असे सांगितले. तसेच राष्ट्रीय बागवानी बोर्डच्या विविध योजनांविषयी अर्ज करताना काय काळजी घेतली पाहिजे व अर्ज कशा प्रकारे भरला पाहिजे याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शिखर बँकेचे अधिकारी श्री. श्रीकांत करेगावकर यांनी बँकेच्या फळबाग व इतर प्रकल्पाच्या कर्ज पुरवठ्याबाबत असणाऱ्या योजनांची माहिती दिली तसेच श्री. संतोष पिसे, कृषी पर्यवेक्षक, बारामती यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
कृषि विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी कृषि विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरत आहे याबद्दल सांगितले. या कार्यशाळेसाठी विविध जिल्ह्यांतून एकूण १०९ शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कृषि विज्ञान केंद्राचे श्री. यशवंत जगदाळे यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथे राष्ट्रीय बागवानी बोर्डच्या योजनांविषयी कार्यशाळा
