बारामती, दि. १५ : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, पुणे (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्य साखळी विकास यंत्रणा अंतर्गत डाळिंब पिकाच्या शेती शाळेचे पिंपळी येथे आयोजन करण्यात आले.
बारामती तालुका सहकारी फलोत्पादन संघाच्या सभासद शेतकऱ्यांसाठी या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजित मगर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, बारामती तालुका सहकारी फलोत्पादन संघ पिंपळीचे अध्यक्ष वसंत घनवट, उपाध्यक्ष प्रमोद निंबाळकर, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब काटे, सभासद आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. काटे यांनी शेतीशाळेच्या पहिल्या वर्गात जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी माती नमुना काढण्याची पद्धत, सेंद्रिय कर्ब, जैविक आच्छादन, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खत व्यवस्थापन, सेंद्रिय खत निर्मिती व हुमणी किड नियंत्रण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
शेतीशाळेत निवड केलेल्या डाळिंब पिकाच्या प्रात्यक्षिक प्लॉट राबविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डाळिंब पिकाचे उत्पादन वाढ तसेच योग्य संगोपनासाठी बुरशीजन्य रोग नियंत्रण, कीड नियंत्रण तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन तशा पद्धतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मोफत देण्यात आल्या.
शेतीशाळेमध्ये कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्यापासून ते आलेल्या उत्पादनाच्या विक्री पर्यंतचे मार्गदर्शक व तज्ञ प्रशिक्षक यांच्याद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्यात येणार आहे.