सांगवी, प्रतिनिधी : दि. 14 ऑगस्ट – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी महाविद्यालयांच्या अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता कार्यानुभव कार्यक्रम हा कृषी विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कराडच्या शासकीय कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुजा अशोक गाढवे हिने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत गाव- सांगवी ता.बारामती येथील शेतकऱ्यांना खरेदी- विक्री संबंधित अॅप्स चा वापर कसा करावा व त्यापासून होणाऱ्या फायद्यांबद्दल मार्गदर्शन केले.
अनुजा गाढवे हिने उपस्थित शेतकऱ्यांना शेती व पिकांच्या संबंधित मोबाईल ॲप्स चा वापर कसा करावा व त्या ॲप्स द्वारे आपल्या मालाची विक्री कशी करावी या बद्दलचे प्रात्यक्षिक करून दाखवले. डाळिंब उत्पादक शेतकरी श्री. संजय तावरे यांना तिने ॲग्री मीडिया, मार्केट यार्ड, कृषिक , ॲग्री ॲप, इत्यादी सारख्या ॲप्स चा वापर कसा करावा व आपल्या मालाची विक्री सुरक्षितपणे कशी करावी याबद्दल माहिती दिली. तसेच पिकांवर कीड व रोगांचा उद्रेक कसा ओळखावा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी ॲप्स चा वापर कसा होतो हे देखील शेतकऱ्यांना पटवून दिले.तिथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी तिचे व तिच्या महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कृषिकन्येस डॉ. आर आर सूर्यवंशी, प्राचार्य, कृषी महाविद्यालय कराड, केंद्र प्रमुख डॉ. उल्हास बोरले, कार्यक्रम समन्वयक डॉ. धनंजय नावडकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना एस साठे , डॉ. आनंद चवई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.