बारामती दि. १२ : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जून रोजी बारामती शहरात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालय सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली आहे.

पालखीदरम्यान वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी, उपचार, तातडीच्या प्रसंगी विशेष उपचार आदी सेवा रुग्णालयामार्फत देण्यात येणार आहेत. परिसराची स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, हॉटेल व्यवसायिकंना मार्गदर्शन करणे, किटकशास्त्रीय सर्वेक्षण, धुर फवारणी बाबत करावयाची कार्यवाही आदींच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत.

शाहू माध्यमिक विद्यालय येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स व आरोग्य कर्मचारी यांचे पथक कार्यरत ठेवणे, पालखी तळावर रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी, परिचारिका २४ तास कार्यरत ठेवणे आदी सेवा देण्यासह उपजिल्हा रूग्णालय बारामती येथे माऊली आंतररुग्ण कक्ष पुरूष व महीला वारकऱ्यांसाठी कार्यरत राहणार आहे.

पालखी काळात वारकरी व भाविकांची आरोग्याबाबतीत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांशी समन्वयाने काम करण्यात येईल, असेही डॉ. जगताप म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed