पुणे, दि.1: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, विदेशी फळे, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी याकरीता क्षेत्र विस्तार कार्यक्रम प्राप्त झाला असून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

अभियानाअंतर्गत घटक निहाय अनुदान
फुले लागवड: कट फ्लॉवर्स – खर्च मर्यादा १ लाख रुपये प्रति हेक्टर, अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार रुपये प्रति हेक्टर तर इतर शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

कंद वर्गीय फुले- खर्च मर्यादा १ लाख ५० हजार रुपये प्रति हेक्टर राहील. अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार रुपये प्रति हेक्टर तर इतर शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

सुटी फुले – खर्च मर्यादा ४० हजार रुपये प्रति हेक्टर, अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार रुपये प्रति हेक्टर तर इतर शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

मसाला पिक लागवड: बिया वर्गीय व कंद वर्गीय मसाला पिकासाठी खर्च मर्यादा ३० हजार प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ४० टक्के रक्कम किंवा १२ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. बहुवर्षीय मसाला पिकासाठी खर्च मर्यादा ५० हजार रुपये असून एकूण खर्चाच्या ४० टक्के रक्कम किंवा कमाल २० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

विदेश फळपिक लागवड: ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी खर्च मर्यादा ४ लाख रुपये प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १ लाख ६० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. स्ट्रॉबेरीसाठी खर्च मर्यादा २ लाख ८० हजार रुपये प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १ लाख १२ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. अवॅकॅडो साठी खर्च मर्यादा १ लाख रुपये प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन: यासाठी खर्च मर्यादा ४० हजार रुपये प्रति हेक्टर असून एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील.

विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटका खाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed