बारामती, दि. १८ : बारामती तालुक्यातील सर्व शासकीय विभागांनी समन्वयातून ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे नियोजन करून यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या.
‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, सहायक गट विकास अधिकारी एन. टी. जरांडे, माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी स्मिता काळे आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत ३० मे रोजी बारामती येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील महसूल, कृषि, पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बाल कल्याण, शिक्षण, सामाजिक वनीकरण, पोस्ट ऑफिस, महावितरण, उप प्रादेशक परिवहन विभाग, म.रा. परिवहन महामंडळ, भूमी अभिलेख, पाटबंधारे आदी विभागांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा.
प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या योजना, लाभार्थी निवडीची प्रक्रीया, योजनांच्या अटी व शर्ती, देण्यात येणारे आर्थिक लाभ याबाबत परिपूर्ण माहिती असणारे स्टॉल्स शिबिराच्या ठिकाणी लावावेत. या ठिकाणी योजनांचे अर्ज भरून घेतले जावेत. त्यादृष्टीने प्रत्येक विभागांनी तयारी करावी. शिबिरात नागरिकांनी, लाभार्थ्यांनी सहभाग घेवून विविध योजनांचा लाभ आणि माहिती घ्यावी, असे आवाहनही श्री. नावडकर यांनी यावेळी केले.