बारामती, दि. १६: बारामती तालुक्यातील विविध विभागांची कामकाज आढावा बैठक उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती येथील सभागृहात सोमवारी (१५ मे) संपन्न झाली.
बैठकीस तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, माळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे, महाऊर्जा पुणेचे विशाल सावंत, उपअभियंता सुभाष पाटील, विजयानंद पेटकर, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, उप अधीक्षक भूमी अभिलेख सोमनाथ कुभांर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती शहरातील सर्व शासकीय कार्यालये, उद्याने, क्रीडांगणे, बाजार समिती, भाजी मार्केट, रुग्णालये, पोलिस ठाणी, चौक्या, मैदाने, विश्रामगृहे, महापुरुषांचे पुतळे आदी ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात यावेत, असे निर्देश देऊन श्री. नावडकर यांनी, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नळ जोडणी व सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. वृक्षारोपणासाठी सर्व शासकीय कार्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याचबरोबर श्री. नावडकर यांनी बारामती येथील विविध विभागांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांची सादरीकरणाद्वारे माहिती घेतली. विकास कामावर चर्चा करून ते म्हणाले, सर्व विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा. विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी खास प्रयत्न करावेत. निधीची मागणी असल्यास प्रस्ताव सादर करावेत. सर्व विभागांनी समन्वयांनी कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.