प्रतिनिधी – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती व राजीव गांधी राष्ट्रीय बौध्दिक संपदा प्रबंधन संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी आयोजित ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, ॲग्री स्टार्टअप , कृषी उद्योजक, कृषि क्षेत्रामधील तांत्रिक कर्मचारी व शास्त्रज्ञ यांच्यासाठी करण्यात आले होते.
अद्यापसुद्धा आपल्या देशात या विषयावर सामान्य शेतकरी वर्ग, विद्यार्थी, तरुण उद्योजक व शास्त्रज्ञ यांना माहितीचा अभाव असल्याचे ब-याचदा निदर्शनात येते ज्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचे नोंदणीकरण होत नाही. त्यामुळे ब-याचदा त्याचा लाभ संबधितांना घेता येत नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस देशातील विविध राज्यातून २०० हून अधिक प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदवत उस्फुर्त प्रतिसाद दिला.
बौद्धिक संपदा अधिकार अंतर्गत कशा प्रकारे नोंदणी केली पाहिजे याची सर्व सखोल माहिती डॉ.भरत सूर्यवंशी, पेटंट व डिझाईन सहाय्यक नियंत्रक, राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा प्रबोधन संस्थान, नागपुर यांनी दिली. राष्ट्रीय बौद्धिक संपदा अंतर्गत नोंदणी करताना ज्या विविध नोंदणी पद्धती आहेत जसे की कॉपीराइट्स, ट्रेडमार्क, इंडस्ट्रियल डिझाईन, भौगोलिक मानांकन व पेटंट नोंदणी याची सर्व माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेचे आयोजन डॉ.धिरज शिंदे व श्री.यशवंत जगदाळे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी केले होते. सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश नलावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.