पुणे, दि. 12: लाल कांद्याची कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्रांकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी २० एप्रिल पूर्वी संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकार विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्राकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

त्यानुसार पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावयाचा असून अर्जासोबत कांदा विक्री पट्टीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, शेतकऱ्याचे बँक खातेपुस्तकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत ( आयएफएससी कोड व खाते क्रमांक तपशीलासह) जोडावयाची आहेत.

कांदा अनुदान अर्जाचा नमुना कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, शेतकरी, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड खरेदी केंद्र येथे सर्व शेतकऱ्यांना निःशुल्क उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्यास साध्या कागदावर देखील विहीत माहिती नमूद करुन कागदपत्रे जोडून अर्ज करता येईल, असे सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) चे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed