बारामती व परिसरामध्ये चायनीज (नायलॉन) मांजा विक्री जोरात सुरू आहे. प्रशासनाने अनेक वेळा कारवाई करून देखील अनेक व्यवसायिक हा व्यवसाय करताना दिसत आहेत. अनेक तरुण घरगुती पद्धतीने मांजा विक्री करत आहेत. सोशल मीडियाचा वापर करून ते जाहिरात करून ग्राहकांना माहिती होईल अशा पद्धतीने हा कारभार चालू आहे. नायलॉन म्हणजेच चायनीज मांज्यावर बंदी असून मोठ्या प्रमाणात सर्रास विक्री होत आहे. अनेक वेळा या मांजामुळे अपघात झालेले आहेत. कानाला कापणे, घशाला कापणे, चेहऱ्यावरती इजा होणे, इथपासून जीवावर बेतेपर्यंतही काही प्रसंग घडले आहेत. या नायलॉन मुळे अनके प्राणी-पक्षी मृत्यू मुखी पडले आहेत, त्या मुक्या प्राण्याच्या जीवाशी खेळ करणे थांबले पाहिजे. शासनाकडून वारंवार आव्हान करून देखील बेकायदेशीररित्या विक्री सुरूच आहे. यावर काही ठोस उपाय योजना राबवून कडक पावले उचलावीत अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
फक्त विक्री करणारेच नव्हे तर विकत घेणाऱ्यावरही किंवा त्याचा वापर करणाऱ्यावर ही कारवाई व्हावी असा सूर नागरिकांमधून येत आहे, जर अल्पवयीन मुलं याचा वापर करत असतील तर त्यांच्या पालकांना कडक शासन व्हावे म्हणजे त्यावर निर्बंध येतील अशी चर्चा ही होताना दिसत आहे. नागपंचमी सण साजरा करताना इतरांना त्यापासून इजा होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. क्षणिक मिळणाऱ्या आनंदासाठी कोणाच्या तरी जीवावर किंवा कुटुंबावर वाईट वेळ येण्याआधीच कारवाई व्हावी.
दरम्यान याबाबत बारामती शहराचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले ” आम्ही दुकानातून विक्री करणाऱ्या वर कारवाही करत आहोत परंतु जर कोणी घरगुती पद्धतीने विकत असेल तर त्यालाही सुट्टी देणार नाही, रस्त्यावर जर कोणी लहान मुलगा चायनीज मांजा वापरून पतंग उडवताना दिसला तर त्याचा तपास करून कोणी विकला त्याच्यापर्यंत पोहोचून त्यांना कठोर शिक्षा केली जाईल.. कोणाचीही गय करणार नाही…
- नामदेव शिंदे.
पोलीस निरीक्षक
बारामती शहर.