पुणे, दि. ६: जिल्ह्यात नागरिकांच्या आधार अद्ययावतीकरणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार वेग देण्यात येत असून यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशीही आधार सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. आधार अद्ययावतीकरण करणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांनी आधार केंद्रात जाऊन अद्ययावतीकरण करावे, असे आवाहनही डॉ. देशमुख यांनी केले आहे.
ज्या नागरीकांनी २०१२ पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे परंतु मागील १९ वर्षामध्ये अद्ययावत (अपडेट) केलेले नाही अशा नागरीकांनी त्यांचे आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. सदयस्थितीत पुणे जिल्ह्यात ३० लाख २६ हजार ८२३ इतक्या नागरीकांचा आधार तपशील अद्ययावत करणे प्रलंबित आहे.
आधार अद्ययावतीकरणाला वेग देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी उपजिल्हाधिकारी तथा आधारच्या जिल्हा नोडल अधिकारी रोहिणी आखाडे यांच्या उपस्थितीत आधारचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक मनोज जाधव, जिल्ह्यातील आधार नोंदणी करणाऱ्या बँका, पोस्ट कार्यालय, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आधार नोंदणीबाबतचे समन्वय प्रमुखांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी जिल्ह्यातील नागरिकांच्या सोईसाठी सर्व आधार सेवा केंद्रे शासकीय सुट्टीच्या व साप्ताहिक दिवशीही सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. विशेष मोहिम म्हणून १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये तालुका, मंडल, क्षेत्रिय कार्यालय स्तरावर ‘आधार डॉक्युमेंट अपडेट पंधरवडा’ राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
माय आधार ॲप आणि आधार संकेतस्थळावर अद्ययावतीकरण १४ जूनपर्यंत मोफत
‘माय आधार’ ॲप आणि आधार संकेतस्थळाचा अवलंब करुन नागरिक आपले आधारमधील नाव, पत्ता, मोबाईल नं., जन्मतारीख, भाषा अद्ययावत करु शकतात. आधार सेवा केंद्रामध्ये आधार तपशील अद्ययावतीकरणासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागते. मात्र, या ॲप व संकेतस्थळावरुन १४ जून २०२३ पर्यंत नागरिकांनी स्वत: आधार अद्ययावतीकरण केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय शुःल्क आकारण्यात येणार नाही.
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी:
नागरिकांनी माय आधार ॲप डाऊनलोड करुन किंवा आधार संकेतस्थळाचा वापर करुन आपला आधार तपशील अद्ययावत करावा किंवा जवळच्या आधार केंद्रात जाऊन तपशील अद्ययावत करावा.