पुणे, दि. ३ : राज्याच्या युवा धोरणाअंतर्गत देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार अंतर्गत २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षाच्या पुरस्काराकरीता जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणारे युवक, युवती व संस्था यांनी १७ एप्रिल पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही ३१ मार्च रोजी ३५ वर्षापर्यंत असावी. जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव असावे. पुरस्कार हा विभागून दिला जाणार नाही किंवा मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. पुरस्कारार्थीच्या कार्याचे सबळ पुरावे आवश्यक असून पुरस्कार दिल्यानंतर दोन वर्ष क्रियाशील राहणे आवश्यक आहे. संस्था पुरस्कारासाठी संस्था नोंदणीकृत आणि किमान पाच वर्ष कार्यरत असावी. संस्थेने स्वयंस्फूर्तीने कार्य केलेले असावे.
पुरस्काराच्या मूल्यांकनासाठी युवा अथवा नोंदणीकृत संस्थाचे ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक कार्य विचारात घेतले जाईल. राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य असावे. समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती, जनजाती व आदिवासी भागात कार्य केलेले असावे. शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रृण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मेस प्रोत्साहन देणारे, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपटी, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवांच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले कार्य, साहसबाबतचे कार्य आदी क्षेत्रातील कार्य असावे.
पुरस्काराचे स्वरुप युवक व युवतींसाठी गौरवपत्र, सन्मानपत्र व प्रती सदस्य १० हजार रुपये व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मान चिन्ह रक्कम ५० हजार रुपये असे आहे.
उमेदवारांनी मुलाखती व कार्याची पीपीटीद्वारे सादरीकरण केलेल्या कामाची सीडी व इतर सबळ पुरावे पृष्ठांकन करुन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत. अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, स.नं १९१, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर, येरवडा पुणे- ४११००६ येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जाच्या विहित नमुन्यासाठी व अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२९३१११९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.