बारामती, दि. १६ : जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्यावतीने व जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्याने आयोजित लोककलांच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा जागर कार्यक्रमाला बारामती शहरासह तालुक्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
लोकजागृती कलामंच पुणे यांनी आज बारामती तालुक्यातील काटेवाडी, शहरातील पंचशील नगर, आमराई व सटवाजीनगर या ठिकाणी कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी स्थानिक नागरिक उपस्थित होते. लोककलापथकाचा हा कार्यक्रम बारामती तालुक्यातील झारगडवाडी, गुणवडी, कन्हेरी, कऱ्हावागज, कोऱ्हाळे बु., माळेगाव, तांदुळवाडी, मोरगाव, आंजनगाव व डोर्लेवाडी या ठिकाणी होणार आहे.
या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती, शाहू महाराज शिष्यवृत्ती, कन्यादान योजना व रमाई आवास योजना यासह विविध योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून या पथकांनी दिली.
या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.