प्रतिनिधी – झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. यापूर्वीच या चित्रपटाचे टिझर आणि काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. टीझरने चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवली असून गाण्यांनाही लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम पाहता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, हे नक्की. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा ‘घर बंदूक बिरयानी’ एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.
टीझरमध्ये पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे आणि यातून काय निष्पन्न होणार आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. दरम्यान या चित्रपटात प्रेमकहाणीही खुलताना दिसत आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणे श्रवणीय आणि सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांचा सुमधुर आवाज लाभलेले ‘गुन गुन’ हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणारे आहे. ‘आहा हेरो’ या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून गणेश आचार्य यांचे या गाण्याला नृत्य दिग्दर्शन लाभले आहे. तर ‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. चित्रपटातील गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून वैभव देशमुख यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत.
निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ”चित्रपटाबद्दल फारसे काही सांगणार नाही. खरंतर हा चित्रपट करण्यास मी आधी नकार दिला होता. मात्र नकळतच माझ्या नकाराचे होकारात रूपांतर झाले. चित्रपटाची कथा चांगली आहे , त्यानुसार गाण्यांचेही लेखन झाले आहे आणि त्याला साजेसे असे संगीत आहे. या चित्रपटात नेमके काय आहे, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.”
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘’ बिर्याणीमध्ये सगळे जिन्नस असतात आणि त्याची प्रत्येकाची एक खासियत असते, जी बिर्याणीला अधिक चविष्ट बनवतात. तशीच या चित्रपटात विविध प्रकारची गाणी आहेत, जी संगीतप्रेनींना नक्कीच आवडतील आणि मुळात नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी ही खासच असतात. तशीच ‘घर बंदूक बिरयानी’तीलही आहेत.’’