बारामती, दि. ४ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्यावतीने लठ्ठपणा या आजाराविषयी तालुक्यात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील पाच शाळांमध्ये १२ ते १७ वयोगटातील मुला-मुलींचे वजन आणि उंचीनुसार ‘बीएमआय’ची (बॉडी मास इंडेक्स) तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत लठ्ठपणा व स्थूलता या विषयी प्रबोधन तसेच जनजागृती केली. लठ्ठपणासारखे आजार नव्या पिढीत होऊ नयेत किंवा त्यावर उपचार आणि प्रतिबंध कसे करावे या विषयीचा उपक्रम राबविला जाणार आहे.
अभियानात डॉ. सौरभ मुथा यांनी विद्या प्रतिष्ठान मराठी शाळेत, डॉ. प्रमोद आटोळे यांनी डॉ. सायरस पूनावला शाळेत विद्यार्थ्यांना लठ्ठपणा, आहार सवयी व जीवन शैली याबाबत माहिती दिली. डॉ. संकेत नाळे यांनी न.पा. शाळा क्र. ५ सेमी इंग्रजी, डॉ. हर्षल त्रिवेदी यांनी न. पा. शाळा क्र. ७ येथे, डॉ. अक्षय सलगर यांनी न. पा. उर्दू माध्यम शाळा क्र. ३ येथे विद्यार्थ्यांना संबोधित केले. या अभियानाचे समन्वयक म्हणून डॉ. तुषार सावरकर यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्यासह उपअधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उदय राजपूत, डॉ. राहुल मस्तूद, डॉ. तुषार सावरकर, समाजसेवा अधीक्षक विनायक साखरे, संध्या नाईक, अधीपरिचारिका सुनीता बुरुंगले, सुवर्णा बीचुकले तसेच शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
लठ्ठपणा व स्थूलता विषयी
तज्ञांच्या मते कमी वयात लठ्ठपणा/ स्थूलता आढळून येणे ही गंभीर बाब आहे. लठ्ठपणा टाळण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, पिझ्झा, बर्गर, फ्राय, चिप्स यासारखे उच्च कार्ब आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. जास्त जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्याने आपल्या शरीरात चरबीच्या रूपात साठवले जाते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी या सवयी बदलल्या पाहिजेत. नियमित व्यायाम केला पाहिजे. लठ्ठपणा/ स्थूलतापणा पासून दूर राहिल्यास भविष्यात होणारे आजार जसे मधुमेह, रक्तदाब, रक्तात चरबीचे प्रमाण वाढणे व मानसिक आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.