बारामती, : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्याबाबत कृषि विभागाच्यावतीने बारामती सहकारी दूध संघाच्या शरद सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राज्य अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल ढाकणे, जिल्हा संसाधन व्यक्ती रवींद्र ढवळे, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, राहुल माने, सूरज जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीमती सुळे यांनी कृषि विभागाने केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांची माहिती घेतली व कृषि विभागाच्या कामाचे कौतुक केले.
प्रस्ताविकात उपविभागीय कृषि अधिकारी श्री. तांबे यांनी बारामती उपविभागातून राज्यात सर्वाधिक १०७ सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग मंजूर झाले असल्याचे सांगून बँकस्तरावर मंजुरीसाठी १८५ प्रकल्प सादर केले असल्याची माहिती दिली.
राज्य अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल ढाकणे, जिल्हा संसाधन व्यक्ती रवींद्र ढवळे यांनी योजनेचा उद्देश, सामाईक पायाभूत सुविधा, मुल्य साखळी, प्रकल्पासाठी लागणारे कागदपत्रे व अनुदानाचे स्वरूप आदी विषयावर मार्गदर्शन करून शंकाचे निरसन केले.
यावेळी सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, हर्षद तावरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपनीचेसंचालक, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, स्वयंसहाय्यता गट, महासंघाचे प्रतिनिधी, आत्मा अंतर्गत गटांचे गट प्रमुख आदी उपस्थित होते.