बारामती दि. १६ : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषि कार्यालय, बारामती येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, आहार तज्ञ प्रशांत भोसले, महिला शेतकरी बचत गट, शेतकरी गट उत्पादक कंपनीचे सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी आहार तज्ञ प्रशांत भोसले यांनी बाजरी व इतर तृणधान्य चे आहारातील महत्त्व सांगून त्यापासून बनवण्यात येणाऱ्या विविध पदार्थाविषयी आणि आहारातील गरजेविषयी माहिती दिली.
श्री. तांबे यांनी तालुक्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहातील महिला शेतकरी बचत गट यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी महीला बचत गटांच्या माध्यमातून तृणधान्य पिकांचे प्रक्रीया उद्योग उभारणी तसेच भविष्यात मानवी आरोग्य सुधारण्यासाठी तृणधान्यांपासून बनविण्यात येणाऱ्या पाककृतीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर यांनी केले.