बारामती दि.२९: ग्राहक सेवा व वस्तूंची निर्धारित किंमत देत असल्याने ग्राहकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, तहसिल कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी अनिल बागल, भूमी अभिलेख विभागाचे उप अधिक्षक गणेश कराड, माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

श्री. कांबळे म्हणाले, शासनाच्यावतीने ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये बदलत्या काळानुरुप सुधारणा करुन ग्राहकाभिमुख सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ग्राहक संरक्षण परिषदेच्यावतीने ग्राहकांच्या हक्काबाबत जनजागृती करण्यात येत असून त्याचा ग्राहकांना फायदा होण्यास मदत होत आहे. सध्याच्या युगात ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात येतात. ग्राहकांनी या जाहिरातींची व त्यातील दाव्यांची शहानिशा करुनच दर्जेदार वस्तू व सेवांची खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ॲड. तुषार झेंडे, विधी तज्ज्ञ ॲड. राहुल तावरे आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य दिलीप शिंदे व नवनाथ मलगुंडे यांनीदेखील यावेळी विचार मांडले. प्रास्ताविकात तहसीलदार पाटील यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

ग्राहक दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत तालुक्यातील विविध विद्यालयातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर येथील विद्यार्थ्यांनी ग्राहकांची होणारी फसवणूक व त्यावर असणारे कायदे याबाबत पथनाट्य सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *