(प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) बारामती नगरीमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने देसाई इस्टेट मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ९ ऑगस्ट, १९९४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्या प्रमाणे सर्व जगभर ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना तसेच महामानवांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोरोना काळात तसेच अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मुक्ता आंभेरे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहराची कार्याध्यक्ष विशाल जाधव होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेंद्र वळवी तर बारामती तालुका प्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यकर्ते शंकर घोडे उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिवस आदिवासी समाजासाठी का महत्वाचा आहे व का साजरा केला जातो या विषयी सविस्तर माहिती शंकर घोडे यांनी प्रास्ताविकातून दिली. बारामती नोकरीनिमित्त आलेले बंधू आणि भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तम गुण संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला तसेच श्रेया रनमोळे एमबीबीएस प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला.

भारतीय संविधान व गुलाब पुष्प देऊन प्रमुख अतिथी यांचा सत्कार करण्यात आला, आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात येऊन आपल्या कला गुणांना वाव दिला पाहिजे. जल,जंगल, जमीन टिकवण्याचे काम खरे तर आदिवासी समाजाने केले आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मुक्ता अंभेरे यांनी सांगितले. आदिवासी समाजातील चालीरीती व रूढी परंपरा याविषयी सविस्तर माहिती कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेंद्र वळवी यांनी सांगितली. आदिवासी समाजातील नोकरदार वर्ग यांनी खेडोपाडी असणाऱ्या आदिवासी समाजाला आपल्याबरोबर घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी तसेच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी पुढाकार घ्यावा असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विशाल जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोकणे यांनी तर स्वागत गणपत जाधव यांनी केले. आभार श्री मीननाथ कौटे यांनी मानले तर कार्यक्रमाचे नियोजन विशाल जाधव मित्र परिवाराने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *