कृषिविषयक प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार

पुणे, दि. ६: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे या संस्थांदरम्यान कृषि क्षेत्राशी संबधित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने डॉ. भास्कर पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी सारथीच्या प्रकल्प संचालक रोहिणी भोसले, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे व्यवस्थापक विश्वास जाधव उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजातील व्यक्तींना होणार आहे. सारथीने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेस या संदर्भात कार्यारंभ आदेश दिला असून सुरुवातीस एकूण दहा प्रशिक्षण कार्यक्रमास मान्यता दिली आहे.

फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षणाअंतर्गत हरितगृह व्यवस्थापन, शेडनेट हाऊस तंत्रज्ञान, रोपांची अभिवृद्धी व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन, पीकनिहाय अभ्यासक्रम-गुलाब, जरबेरा, कार्नेशन, पीकनिहाय अभ्यासक्रम -रंगीत ढोबळी मिरची, चेरी टोमॅटो, काकडी तर फलोत्पादन व्यवस्थापन प्रशिक्षणाअंतर्गत लॅन्डस्केपिंग व्यवस्थापन, ऊती संवर्धन तंत्रज्ञान, फ्लॉवर अरेंजमेंट/ड्राय फ्लॉवर आणि प्लॅन्ट पार्ट्स आणि काढणी पश्चात प्रशिक्षणाअंतर्गत भाजीपाला व फळ पिकांचे काढणी पश्चात व्यवस्थापन, पुरवठा साखळी व्यवस्थापन या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

सामंजस्य करार ३ वर्षाकरीता असून यासाठी उमेदवाराची पात्रता, अटी व कागदपत्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून या अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन सुविधा लवकरच राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *