शेततळ्यांना प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

पुणे दि. ५ : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी राज्यस्तरावर नोंदणी झालेल्या प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांचे विक्रेते, वितरकांनी १५ डिसेंबर पर्यंत जिल्हास्तरावर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सामुहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकांसाठी प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची राज्यस्तरावर नोंदणी करण्यात आली आहे. या उत्पादक कंपन्यांच्या विक्रेते, वितरकांचीही जिल्हास्तरावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार १५ डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

नोंदणीसाठीच्या अर्जाचा विहित नमुना तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय उपलब्ध आहे. अर्जासोबत १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावरील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या नावे राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेची २ लाख रुपयांची मूळ हमी प्रत व एक छायाकित प्रत, १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावरील नोंदणीच्या अटी व शर्ती बाबत करारानामा, मान्यताप्राप्त उत्पादक कंपनीचे वितरक प्रमाणपत्र, कंपनीचे राज्यस्तरीय नोंदणी प्रमाणपत्र, वितरक व उत्पादक यांच्यातील करारनाम्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

याशिवाय वितरक दुकान स्थळ, जागेचा ८-अ ग्रामपंचायत किंवा नगरपालिका मालमत्ता पत्रक असा पुरावा, दुकान भाड्याने घेतले असल्यास भाडेकरार व जागा मालकाचे नाव असलेला जागेचा उतारा किंवा ग्रामपंचायत/नगरपालिका कर भरणा पावतीची छायांकित प्रत, दुकान नोंदणी प्रमाणपत्र, पॅनकार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड व बँक पासबुकची छायांकित प्रत आदी कागदपत्रेही अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असेही श्री. काटकर यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *