बारामती दि. २ : बारामती तालुक्यात कृषी विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारे उभे करण्याची मोहीम तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनखाली सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सायबांचीवाडी येथील वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे.
ओढ्यातून वाहत जाणारे शेवटच्या टप्यातील पाणी अडवून सायबांचीवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे गावातील आसपासच्या विहिरींना आणि शेतीपिकांना पाणी मिळणार असून पाण्याचा फायदा रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू इत्यादी पिकांना जीवनदान देण्यासाठी होणार आहे, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली आहे.
सायबांचीवाडी येथील अस्मिता ग्राम संघाच्या महिला, अध्यक्ष व गावातील शेतकऱ्यांच्या श्रमदानातून हा वनराई बंधारा उभारण्यात आला आहे.
सायबांचीवाडी परिसरात लोकसहभागातून जास्तीत जास्त वनराई बंधाऱ्याची उभारणी करावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.