कृषी आयुक्त पदाचा कार्यभार सुनील चव्हाण यांनी स्वीकारला

पुणे, दि ३०: राज्याच्या कृषी आयुक्त पदाचा कार्यभार आज भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वीकारला.

श्री. चव्हाण हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी औरंगाबाद व रत्नागिरी, महावितरण औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, राज्याच्या जलसंधारण विभागाचे उपसचिव, नाशिक विभागीय आयुक्तालय येथे उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त म्हणून तसेच प्रकल्प व्यवस्थापक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव या पदांवर सेवा बजावली आहे.

आपल्या सेवा कार्यकाळामध्ये राज्यातील अवर्षण प्रवण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट नाला बांधांचे बांधकाम, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 5 लाख वृक्ष लागवड व संवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक विकास योजना आणि रोहयोअंतर्गत 12 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा व काजू लागवड याबाबत विशेष कामगिरी बजावली आहे.

भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासमोर ‘सायलेंट इंप्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लांट ठाणे कॉर्पोरशेन’ बाबत सादरीकरण श्री. चव्हाण यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत 18 हजार अनाधिकृत इमारती व बांधकामांचे पाडकाम करण्यात विशेष भूमिकाही त्यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *