पुणे दि. 30: पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17(3)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून 23 डिसेंबरपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्यावने तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या पुणे‍ जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची आचारसंहिता अमलात असून 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच निकाल अंतिमरित्या जाहीर करण्याची तारीख 23 डिसेंबर अशी असून या तारखेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

23 डिसेंबरपर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई


या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

384 शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश


जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून शस्त्रांचा गैरवापर होऊ शकतो अशा 384 शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना दिले आहेत. यामध्ये जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7, भोर- 24, घोडेगाव- 4, खेड- 8, आळेफाटा- 4, माळेगाव- 53, वडगाव निंबाळकर- 49, वालचंदनगर- 40, भिगवण- 29, इंदापूर- 19, यवत- 22, शिरुर- 9, रांजणगाव- 3, राजगड- 14, वेल्हा- 68, पौड- 20, लोणावळा ग्रामीण- 2, लोणावळा शहर- 1, मंचर- 4 आणि पारगाव पोलीस ठाणे हद्दीतील 4 शस्त्र परवानाधारकांचा समावेश आहे. 23 डिसेंबरनंतर 7 दिवसांच्या आत संबंधितांना शस्त्र परत करावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मतदान व मतमोजणी केंद्राच्या परिघात प्रतिबंधात्मक आदेश.


221 ग्रामपंचायतीसाठी मतदानाचा दिवस 18 डिसेंबरला ते मतमोजणीचा दिवस 20 डिसेंबर या कालावधीत मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्राच्या परिघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित दिवशी या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना आदी तत्सम बाबी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *