प्रतिनिधी – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व महाराष्ट्र राज्य औषधी व सुगंधी वनस्पती मंडळ पुणे आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र -कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ” फळे व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण” दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर 2022 रोजी भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी नाशिक, औरंगाबाद व लातूर विभागातून एकूण ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. विशेष करून या प्रशिक्षणामध्ये तरुण पिढीचा जास्त सहभाग दिसत होता आणि त्यांना रोपवाटिकेमधील आधुनिक तंत्रज्ञान जाणून घ्यायचे होते. या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामतीच्या विविध तज्ञांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने रोपवाटिकेचे प्रकार, रोपवाटिका तयार करताना कोणकोणत्या प्रकारची लायसन्स लागतात, रोपे तयार करताना कशाप्रकारे कोकोपीट ची निवड करावी त्यावर कशी प्रक्रिया करावी, रोप कोकोपीट ट्रेमध्ये लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन कशा पद्धतीने करावे तसेच रोपवाटिकेमधील कीड ,खत, रोग व पाणी व्यवस्थापन अशा विविध विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. या तज्ञांमध्ये श्री यशवंत जगदाळे, श्री तुषार जाधव, श्री विजय मदने व अभिजीत जमदाडे यांचा सहभाग होता. आत्तापर्यंत भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामतीने महाराष्ट्र राज्य औषधी व सुगंधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या आर्थिक सहाय्याने विविध प्रशिक्षणे शेतकऱ्यांसाठी आयोजित केली आहेत.
यामध्ये आत्तापर्यंत हरितगृह मधील भाजीपाला व्यवस्थापन याचे प्रशिक्षण १२१ शेतकऱ्यांना देण्यात आले. फळे व भाजीपाला पिकांचे काढणी नंतरचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया या विषयाचे ४० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये फळ पिके निर्यात, सेंद्रिय शेती, ॲग्री बिझनेस स्टार्ट -अप अशा विविध विषयावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख व प्रशिक्षण समन्वयक श्री यशवंत जगदाळे यांनी दिली.
ही सर्व प्रशिक्षण आयोजित करणे तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकावर भर देऊन कशाप्रकारे प्रशिक्षण देण्यात यावे याविषयी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र दादा पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे आणि डॉ.धीरज शिंदे प्रमुख कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे मार्गदर्शन लाभले.