बारामती दि. २८ : क्रीडा विभागाच्यावतीने बारामती तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धांचे वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वसतिगृह विद्यालय काऱ्हाटीच्या १७ व १९ वयोगटातील मुलींनी आपले वर्चस्व कायम ठेवले.
स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव आणि कृषि उद्योग मुल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी केले. कार्यक्रमास कृषि उद्योग मुल शिक्षण संस्थेचे संचालक दत्तात्रय वाबळे, प्रणव सोमण, प्रशासक विकास निर्मल, काऱ्हाटी गावचे सरपंच बी. के. जाधव, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, महेश चावले आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या संघांची नावे पुढीलप्रमाणे- १४ वर्ष वयोगट, मुले- श्री भैरवनाथ विद्यालय उंडवडी, मुली- शहाजी हायस्कूल सुपे, १७ वर्षे वयोगट मुले- शहाजी हायस्कूल सुपे, मुली-वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी, १९ वर्षे वयोगट मुले- शारदाताई पवार विद्यानिकेत, शारदानगर, मुली- वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी.
स्पर्धेचे बक्षीस वितरण तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, वसतिगृह विद्यालयाच्या प्राचार्या अनिता चव्हाण व विद्या प्रतिष्ठानचे प्राध्यापक लक्ष्मण मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब कोकरे यांनी केले.