प्रतिनिधी – पावसाळा संपुष्टात आला असला तरी नाले-ओढ्यांना पाणी प्रवाही आहे. या वाहून जाणार्या पाण्याचा योग्य विनियोग करण्याच्या उद्देशाने वनराई बंधारे उपयुक्त ठरणार आहेत. यंदाच्या हंगामात पावसाळा चांगलाच लांबला. शिवाय, सातत्याने पर्जन्यवृष्टी होत राहिल्याने भूजल पातळी चांगलीच सुधारली असली तरी पाणी व्यवस्थापनाला पर्याय नाही. जेणेकरून उन्हाळ्यातही सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शक्य होईल. सद्य:स्थितीत ओढे-नाल्यांमधील वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधकाम मोहीम कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. वनराई बंधारा हा जमीनतळापासून चार ते पाच फूट उंच व नाल्याच्या रुंदीनुसार दहा ते पंधरा फूट लांब बांधण्यात येतो. त्यासाठी तीन थरांमध्ये ऐंशी ते शंभर गोणीची आवश्यकता असते. एक वनराई बंधार्याद्वारे अर्धा एकर क्षेत्र सिंचित होऊ शकते. अशा वनराई बंधार्याच्या माध्यमातून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी सिमेंट व खतांच्या रिकाम्या गोण्या, माती व वाळूचा वापर करून पाण्याचा प्रवाह अडविण्यात येतो. त्याचा परिसरातील शेतकर्यांना लाभ होतो. या मोहिमेचा एक भाग म्हणून दौंड तालुक्यातील रावणगाव येथे उपविभागीय कृषि अधिकारी बारामती, वैभव तांबे व तालुका कृषि अधिकारी दौंड, राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली रावणगाव येथील कृषि सहाय्यक अंगद शिंदे,मळद चे कृषि सहाय्यक अझरुद्दीन सय्यद, पाणी फाऊंडेशन चे अॅड रवींद्र पोमणे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत शिंदे, कृषि पर्यवेक्षक संजय कदम यांनी स्थानिक तरुण व परिसरातील शेतकऱ्यांना मदतीस घेऊन उत्कृष्ट असे वनराई बंधारे रावणगाव येथे बांधून पूर्ण केले आहेत. यामुळे वाहून जाणारे पाणी साठून राहून शेतकऱ्यांना शेतीसाठी व जनावराना पिण्यासाठी मोठया प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी दिपक चव्हाण,शिवलाल शेळके, भिमराव चव्हाण,अजय आटोळे, भाऊसाहेब आटोळे, अमोल आटोळे,अरुण आटोळे यांनी सहकार्य केले.