माळेगाव – राज्यकर्त्यांनी शाहू, फुले, आंबोडकर आदी थोर पुरूषांचे विचार डोळ्यासमोर ठेवून सामान्य मानसाच्या भविष्याची जाण ठेवली तर समाज उन्नतीचे काम वेगाने घडू शकते. अर्थात त्या कामाची जाणीव पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना होण्यासाठी माळेगाव पत्रकारांचा कट्टा उपयुक्त ठरेल, असा विश्वास कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी सध्या राजकारण्यांची कार्य़शैली खूपच खालावत चालल्याची खंतही स्पष्टपणे बोलून दाखविली. माळेगाव (ता.बारामती) येथील कल्याण पाचांगणे यांच्या संकल्पनेतून नव्याने स्थापन झालेल्या पत्रकारांच्या कट्ट्यावर मंगळवारी ( ता.२५) रोजी दिवाळी साजरी करण्यासाठी आमदार रोहित पवार आले होते. त्यावेळी ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते. कार्य़क्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेत्या संगिता निंबाळकर उपस्थित होत्या. भविष्याची जाण आणि वास्तव्याचे भान असलेले नेते म्हणून पवारसाहेब आणि अजितदादांकडे मी पहातो,असे सांगून रोहित पवार यांनी सामाजिक कामातून स्वतःची राजकारणामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे जाहिर केले. कारगिल सैनिकांमध्ये पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नक्षली भागातील पोलिसांबरोबर दिवाळीचा आनंद घेतला, असे विचारले असता पवार म्हणाले, खूपच चांगली गोष्ट आहे. देश आणि राज्याच्या मुख्य पदावर काम करणाऱ्या नेतेमंडळींनी सैनिक, पोलिसांबरोबर दिवाळी घालविली तर संबंधितांचे मनोबल उंचावते. अर्थात ते कार्य़ देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फायद्याचे आहे.
विधीमंडळातील गोंधळाचे वाढते प्रमाण लोकांना संतापजणक वाटते, याकडे पत्रकारांशी लक्ष वेधले असता पवार म्हणाले,“हा मुद्दा भविष्याच्या दृष्टींने चिंतेचा आहे. गोंधळाचे वातावरण असेच चालू राहिले तर त्याचा विपरित परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार आहे. त्यामुळे माझ्यासह राजकारण्यांनी आपल्या कार्यशैलीत बदल हा केलाच पाहिजे. विकास कामांना केंद्रस्थानी ठेवून लोकांचा विश्वास संपादन केल्याखेरीज मतदानाची टक्केवारी वाढणार नाही. कर्जत-जामखेडचे माजी मंत्री राम शिंदे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात लक्ष घालण्यास सुरावात केली यावर पवार म्हणाले, की विधान परिषदेवर गेलेल्या भाजपच्या आमदाराला स्वतःच्या तालुक्यात काहीही करता आले नाही मी बारामतीमधून जावून लोकांचे प्रश्न सोडविले आणि त्यांना लोकांमधून पराभूत केले. त्यामुळे त्यांनी बारामतीत लक्ष घालून काय उपयोग आहे. शेवटी लोक कामला विशेष महत्व देतात. यावेळी पवार यांनी राहुल गांधीच्या भारत जोडो अभियानासह साखर उद्योगातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी कल्याण पाचांगणे, पत्रकार विजय भोसले, सतिश गावडे, योगेश भोसले, प्रणव तावरे, भारत तुपे, संदीप आढाव, प्रदीप जगदाळे, प्रा.अनिल धुमाळ, आसिफ शेख यांच्यासह अनेकांनी निर्णायक भूमिका मांडली.