भारतीय समाजातील स्त्रियांच्या कथा, व्यथा, वेदना सांगणाऱ्या अनेक कथा, कविता आणि कादंबऱ्या भारतीय साहित्यात होऊन गेल्या. त्यातील अनेक कथांवर अनेक मालिका, माहितीपट, नाटके आणि चित्रपटही येऊन गेले. त्यांनी त्या त्या काळात भारतीय समाजमनावर आपली वेगळी छाप सोडल्याचे ही आपल्या लक्षात येते. यात शहरी, ग्रामीण, सुशिक्षित, अशिक्षित, सवर्ण आणि शूद्र या भारतीय समाजव्यवस्थेने जाणीपूर्वक निर्माण केलेल्या भेदात आणि वर्गात मोडणाऱ्या अनेक स्त्री व्यक्तिरेखांचा समावेश असल्याचे दिसून येते. परंतु पाठीवर बिऱ्हाड घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी पायपीट करणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजाची आणि त्यातही या वर्गातील स्त्रियांची दुःखे मांडणाऱ्या चित्रकृती अत्यंत दुर्मिळ आहेत. त्यातही मराठी चित्रपटसृष्टीच्या दुर्दैवाने भटक्या विमुक्त समाजाची आणि त्यातही या समाजातील स्त्रियांची दुःखे आणि हालअपेष्टा मांडण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला नव्हता. मुळात व्यवस्थेकडून हा संपूर्ण समाजच दुर्लक्षित राहिल्यामुळे समाज म्हणून आपण या समाजाच्या दुःखांवर जाणीवपूर्वक लिहायचे-बोलायचे टाळले आहे त्यामुळे या समाजातील स्त्रियांची दुःखे आणि व्यथा आजपर्यंत समाजासमोर आलेल्या नाहीत. राजेंद्र बरकडे निर्मित आणि दिग्दर्शित “वाघर” या चित्रपटाने ही कमतरता भरून काढली असून भटक्या विमुक्तांमधील विशेषतः धनगर समाजातील मुली व स्त्रियांच्या व्यथा आणि वेदना त्यांनी अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटातून समोर आणल्या आहेत. आपल्या चित्रपट दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात राजेंद्र बरकडे आणि भीमराव पडळकर त्यात यशस्वी झाले आहेत.
हा चित्रपट ‘ठकी’ नावाच्या एका अल्पवयीन मुलीच्या बालवयातील विवाहमुळे तिच्या झालेल्या परवडीची कहाणी अत्यंत परखडपणे समोर मांडतो. इतर मुलांमुलींप्रमाणे शाळा शिकायची इच्छा असतानाही आपल्या समाजात मुलींना शाळा शिकवली जात नाही असे म्हणून मुलीला शाळेत न घालता मेंढरांच्या पाठीमागे लावणारे आई-वडील वयाच्या बाराव्या वर्षी तिची इच्छा नसतानाही लग्न लावून देतात आणि त्यामुळे तिची होणारी होरपळ या सगळ्या गोष्टी प्रेक्षक म्हणून मनाला वेदना देऊन जातात. ही सर्व माणसे आपल्या समाजाचाच भाग आहेत आणि तरीही आपल्यापासून लांब आहेत याचे आपल्याला काहीच वाटत नाही तसेच ती त्यांची वैयक्तिक बाब आहे असे आपल्याला वाटत राहणे हा आपल्या माणूसपणाचा पराभव आहे याचीही चित्रपट सतत जाणीव करून देत राहतो. भटक्या विमुक्त समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यावरही चित्रपट प्रभाव टाकतो. समाज मागास असल्याने तसेच स्वतःच्या हक्काचे घरदार नसल्याने सतत भटकंती करत आणि जिथे जाईल तिथे तिथल्या तथाकथित उच्चभ्रू लोकांवर आणि त्यांच्या मेहरबानीवर या समाजाला आयुष्य काढावे लागते. वेळप्रसंगी त्यांच्याकडून होणारे अन्याय अत्याचार ही सहन करावे लागतात हेही चित्रपट प्रभावीपणे दाखवीतो.
गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या समाजातील स्त्रियांकडे अत्यंत वाईट नजरेने पाहतात तरीही त्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य या लोकांचे काहीही वाकडे करू शकत नाहीत ही या समाजाची हतबलता चित्रपट नकळत पण नेमक्या पद्धतीने मांडतो. मुलगी म्हणजे डोक्यावरचे ओझे असा या समाजातील समजही आपल्यासमोर येतो. त्यामुळेच मुलीचे अल्पवयात लग्न लावून दिल्यानंतर आपली जबाबदारी संपली असे मानून मुलीचे आई-वडील तिचे जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देतात. सासरची माणसे कशी आहेत? ती आपल्या मुलीला योग्य वागणूक देतील की नाही? याचा कोणताही विचार न करता मुलींची लग्न केली जातात. इतर समाजातील कोणी सांगायचा किंवा समजाविण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आमच्या पद्धतीने जीवन जगू द्या असे म्हणून समाजापासून फारकत घेण्याची मानसिकता आजही या समाजामध्ये असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुली आणि महिलांवर इतरांकडून होणारे अन्याय अत्याचार सहन केले जातात किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच या समाजातील महिलांच्या जीवालाही त्यातून धोका निर्माण होतो परंतु या सगळ्या गोष्टी हा समाज अत्यंत सहजतेने घेतो यावरही चित्रपट प्रकाश टाकतो. गावातील प्रमुख व्यक्ती म्हणून गावातील सरपंच आणि पाटील यांची या समाजाला योग्य दिशा देण्याची आणि सुधारणांची माहिती देण्याची जबाबदारी असतानाही हा समाज त्याकडे कानाडोळा करतो किंवा ते इतर जातीचे आहेत आणि त्यांच्या रूढी-परंपरांमध्ये आपण ढवळाढवळ करायला नको म्हणून तेही याकडे दुर्लक्ष करतात ही अत्यंत लाजिरवाणी बाब या चित्रपटातून समोर येते.
भटक्या विमुक्तांचे जगणे दाखविण्यात मध्यंतरापर्यंत थोडासा रेंगाळलेला हा चित्रपट या ठकीच्या लग्नानंतर तिच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव पकडतो आणि प्रेक्षक चित्रपटांमध्ये गुंतून जातात. तांत्रिक बाजूने चित्रपट थोडासा कमकुवत असला तरी सशक्त कथानकामुळे आणि प्रमुख कलाकारांच्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव पकडतो.
चित्रपटातील सर्वच कलाकार नवखे आहेत पण त्यांनी आपापल्या भूमिका अत्यंत चोखपणे बजावलेल्या आहेत. ‘ठकी’ची भूमिका करणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या समीक्षा सोनवलकरने अत्यंत समजून- उमजून आपली भूमिका केली आहे. ठकीसह तिच्या आईच्या भूमीकेतील शैला बगाडे आणि सासूच्या भूमिकेत असलेल्या जयश्री कडेकर स्त्री कलाकारांनी संपूर्ण चित्रपट आपल्या अभिनयाच्या जोरावर पेलला आहे. आपल्या मुलीचा संसार नीट नाही म्हणून ती माहेरी राहते तेव्हा सुनेला ही सासरचे सुख मिळता काम नये. या मानसिकतेची सासू, भावजयीला पती सुख मिळू नये म्हणुन कट कारस्थाने करणारी नणंद अश्या अनेक व्यक्तिरेखा आपण अनेक चित्रपटातून याअगोदर पाहिलेल्या असल्या तरी या चित्रपटात त्याचे सादरीकरण आणि त्यातील संवाद शैली पूर्णपणे वेगळ्या ठरतात.
मिलिंद शिंदे यांनी साकारलेला गावाचा बेरकी पाटील चित्रपटाला आणखी उंचीवर घेऊन जातो. स्वतःला समाजसेवक समजणारा, परस्त्रियाबाबत कामवासना बाळगणारा आणि ‘शिक्षकांनी फक्त शिकवायचे असते, समाज शहाणा करायच्या फंदात पडायचे नसते’, असे सांगणारा पाटील त्यांनी आपल्या देहबोली आणि अभिनयाने जिवंत केला आहे. सर्वच कलाकार ग्रामीण भागातील असल्याने चित्रपटाचा रंग-ढंग आणि बाज पूर्ण ग्रामीण आहे. बाकी ‘ठकी’साठी तळमळ वाटणारी शिक्षिका, शाळेतील सहकारी गुरुजी, ठकीचे मामा आणि गावाचा पाटील याच्या भूमिका महत्वाच्या असताना त्यांना फार वाव मिळाला नाही असे वाटते. चित्रपटात संवादाच्या अनुषंगाने येणाऱ्या शिव्या सामाजिक भाषाशैलीला समांतर आणि अधूनमधून गंभीर वातावरण हलके करण्यास मदत करतात.
त्यामुळे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या नवख्या टीमने सादर केलेली ही सुंदर कलाकृती एकदा का होईना सहकुटुंब अनुभवायलाच हवी!
के.राहुल, 9096242452