माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) बारामती तालुका हा शेती व शेतीपुरक व्यावसायासाठी समृध्द आहे. येथील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन यश संपादन करत असतात आणि नावलौकीक मिळवत असतात. अशाच नावलौकीकास पात्र ठरणारे जळगाव कडे पठार गावचे शेतकरी संदिप लोणकर. त्यांनी मुरघास उत्पन्नात यश मिळविले, त्या मागची प्रेरणा काय होती. त्याविषयी…!!
संदिप लोणकर यांची परस्थिती तशी हालाकिची, जळगाव क.प. येथे मालकी हक्काची साडे पाच एकर शेती. त्यामध्ये बहूतेक शेती कोरडवाहूच. शेतातून जेमतेमच उत्पन्न मिळत असे. मात्र आर्थिक प्रगतीसाठी कोणता तरी शेतीपुरक व्यवसाय करायला हवा, असे विचार त्यांच्या मनात वारंवार येत असंत. म्हणतात ना इच्छा असेल तेथे मार्ग सापडतोच…. बारामती तालुक्यात मुरघास हा एक चांगला शेतीपूरक व्यवसाय ठरु शकतो आणि आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही हे ठरवत असतांना त्यांनी कृषि विज्ञान केंद्र, बारामती, कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्याकडून मुरघास तयार करण्याचे मार्गदर्शन घेतले. मग त्यांनी मुरघास तयार करणा-या शेतीपुरक व्यवसायामध्येच जम बसवायचा, असा त्यांनी मनोमनी निश्चय केला. नंतर कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे जाऊन त्यांनी मुरघार कसे बनवतात याबाबतचे प्रशिक्षण घेऊन अद्यावत तंत्रज्ञान आत्मसात केले.
सन 2011 मध्ये त्यांनी प्रायोगिक तत्वावर स्वत:च्या गोठयासाठी मुरघास तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी त्यांच्या 3 एकर शेतीत मक्याचे पीक घेतले. मुरघासामध्ये त्यांना चांगला फायदा दिसू लागला. मग ते त्यांच्या गावातील शेतक-यांना, त्यानंतर इतर गावातील शेतक-यांना मुरघास बनवून विक्री करु लागले. त्यात त्यांचा चांगला जम बसू लागला. मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. बारामती तालुक्यासह शेजारील तालुके इंदापूर, पुरंदर आणि दौंड येथील दुध उत्पादन करणा-या शेतक-यांकडून त्यांना मुरघासच्या मागण्या मोठया प्रमाणात येऊ लागल्या. मोठ मोठया दुध उत्पादन करणा-या शेतकऱ्यांना ते मुरघास पुरवू लागले. त्यातून त्यांची आर्थिक घडी सुधारु लागली. आज त्यांच्याकडे मुरघास बनविण्यासाठी लागणा-या दोन मशिन आणि दोन टॅक्टर आहेत. रोज 100 टन मुरघास तयार करण्याची त्यांची क्षमता आहे. ते मुरघासचा साठा करुन ठेवतात. मका काढणीच्या सिझनवर त्यांच्याकडे 50 ते 60 व्यक्तींना रोज रोजगार मिळतो. त्यांची महिन्याची सर्व खर्च जाऊन कमाई सरासरी एक ते दीड लाख रुपयांची आहे. यामुळेच तर नोकरी पेक्षा शेतीपुरक व्यवसाय किती फायद्याचा ठरु शकतो, असे ते आर्वजून म्हणतात. परदेशात मुरघास बनविण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरतात ते आज बारामती येथे ते वापरत आहेत. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. सुरवातीला घरातील गोठयासाठी मुरघास बनविणारे लोणकर आज यशस्वी मुरघास व्यवसायीक म्हणून प्रसिद्ध झाले , यातच त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांच्या या यशाच्या मागे त्यांची जिद्द, चिकाटी व त्याला मोठ्या कष्टाची जोड आहे हे विसरुन चालणार नाही.
बारामती हा दुध उत्पादनामध्ये एक आघाडीचा तालुका म्हणून ओळखला जातो. दुग्ध व्यवसाय करत असतांना वर्षभर दुभत्या जनावरांना पौष्टिक आहार पुरविणे गरजेचे असते. या तालुक्यात पाऊस तसा कमीच असतो. कधी कधी पाऊस कमी पडला तर जनावरांच्या चा-याचा प्रश्न उद्वभवत असतो. त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजेच मुरघास. या तालुक्यात दुग्धव्यवसाय करणा-या शेतक-यांची संख्याही खूप आहे. त्यामुळेच मुरघास प्रकल्पात आणखीन प्रगती करण्यास वाव आहे, असे लोणकर म्हणतात.
मुरघास म्हणजे मुरलेला चारा (घास). अगदी मुरांबा किंवा मोरावळया सारखा. हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नास न होऊ देता किमान 45 दिवस हवाबंद करुन वेगवेगळया मार्गानी साठवून ठेवणे म्हणजेच मुरघास. मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा इत्यादी पीके वापरली जातात.
मुरघासचे फायदे :-
• वर्षभर चांगल्या प्रतीचा चारा एकसारखा मिळाल्याने जनावरांच्या पोटाचे आजार कमी होऊन त्यांचे आरोग्य सुधारते.
• कमीत कमी शेती दुग्ध उत्पादक शेतकरीही मुरघास केल्यावर जास्त गाईंचा आरामशीर सांभाळ करु शकतो.
• वर्षभराच्या हिरव्या पीकाचे नियोजन पावसाळा असतानाच करता येते.
• उन्हाळयातही जनावरांना हिरवा व पौष्टिक चारा मिळण्यास मदत होते.
• मुरघासाने जनावरांच्या दुधात वाढ होते.
• मुरघासाचा चारा पीक 75 ते 80 दिवसात तयार होते. त्या जमीनीत पुन्हा लगेच दुसरे पीक घेणे सोपे जाते.
• मुरघासामुळे हिरव्या चा-याची गुणवत्ता सुधारते. खुराकामध्ये काही प्रमाणात बचत होते.
• दुष्काळाचा विपरित परिणाम होत नाही.
• जनावरे मुरघास आवडीने खातात. चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी आहे.
मुरघासाचे गट्टे तयार करणारी अत्याधुनिक मशिन खरेदी करण्याचा आणि याच व्यवसायात पुढे आणखीन प्रगती करण्याचा श्री. लोणकर यांचा विचार आहे, असे ते आवर्जून सांगतात. या व्यवसायात त्यांना चांगला आर्थिक लाभ मिळत असल्याने ते समाधानी आहेत. कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथील डॉ. रतन जाधव यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. तसेच कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बारामती यांच्याकडूनही लोणकर यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.
रोहिदास गावडे
माहिती सहायक
उपमाहिती कार्यालय, बारामती